क्रीडा

अंबाजोगाईच्या पार्थ हिबाने याची शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी अंबाजोगाई येथील पार्थ संजय हिबाने याची 14 वर्षाखालील गटामधून निवड झाली आहे. पार्थ याची निवड बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा कै.रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खाडे यांनी केले. पार्थची निवड झाल्याबद्दल प्रदीप खाडे यांच्या निवासस्थानी आज कौटुंबिक सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय सोलापूर व शिवरत्न स्कूल अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ते 5 जानेवारी अकलूज येथे निवड शिबिर घेण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून पार्थ संजय हिबाने निवड झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागातून 57 विद्यार्थी येथे खेळण्यासाठी आले होते. छत्रपती संभाजी नगर विभागातून पाच खेळाडू या शिबिरात सहभागी झाले होते. त्यामधून पार्थ संजय हिबाने याची निवड झाली आहे. पार्थ हिबाने हा अंबाजोगाई येथील सिनर्जी स्कूलमधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी आहे. पार्थ हिबाने याच्या निवडीबद्दल नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आज अंबाजोगाई येथे शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा कै.रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खाडे यांच्या निवासस्थानी त्याचा आई-वडीलासह फेटा बांधून, शाल व श्रीफळ देऊन हृदय पूर्ण सत्कार केला. प्रदीप खाडे, सौ. दैवता प्रदीप खाडे यांनी संजय हिबाने व सौ. हिबाने यांचा सत्कार केला.यावेळी प्रदीप खाडेसह रामराजे तोडकर आदी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब – प्रदीप खाडे

14 वर्षाखालील राज्यस्तरीय क्रिकेट संघामध्ये अंबाजोगाई येथील पार्थ हिबाने याची झालेली निवड बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा कै.रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खाडे यांनी केले आहे. छत्रपती संभाजी नगर विभागातून पाच खेळाडूमधून तर राज्यातील 56 विद्यार्थ्यांमधून पार्थची निवड होणे हे त्याच्यासाठी आनंदाची तर आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे अशा खेळाडूचे कौतुक होणे गरजेचे असल्याचे सांगून राज्यस्तरीय स्पर्धेत बीड जिल्ह्याचे नाव उंचावणारे कामगिरी तो करेल असा विश्वास खाडे यांनी व्यक्त केला.

क्रिकेट क्षेत्रात बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करणार – पार्थ हिबाने

लहानपणापासून क्रिकेटची आवड असणाऱ्या पार्थ हिबाने याने आंतर शालेय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. क्रिकेट क्षेत्रात बीड जिल्ह्याचे नाव उज्वल होईल असा खेळ आपण करणार असल्याचे त्याने सांगितले आवडता खेळाडू रोहित शर्मा असला तरी झहीर खान सारखा फास्ट बॉलर होण्याचे आपले स्वप्न असल्याचे पार्थ याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!